Home > Work > Gulmohar

Gulmohar QUOTES

1 " का वं? असं कशापायी? चांगलं बेस झाड हाय की. बांधकामात येतं की काय? अरारा, लई वंगाळ. मला वाटलं, बाभूळ वगैरं असेल. झाड वाचवा साहेब, चांगलं हाय.’’ ‘‘तू काम कर. मला शिकवू नकोस. मला हे झाड नको म्हणजे नको.’’ लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुऱ्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसऱ्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्षवाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाऱ्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. वेचता वेचता त्यांना उगीचच भास्कर आठवला. त्यांना वाटलं, आपण फुलं गोळा करीत असताना तो पटकन म्हणेल, ‘‘चक्कर आहे दिवाकरपंत.’’ घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं. रस्त्यावरून जाणारे येणारे म्हणत होते, ‘‘आम्ही असतो तर झाड बचावून बंगल्याचा प्लॅन केला असता.’’ –घावाघावागणिक दिवाकरपंत तांबड्या फुलांच्या सड्यात भिजत होते. "

V.P. Kale , Gulmohar